मलेरिया म्हणजे हिवताप! थंडी किंवा हुडहुडी भरून येणारा ताप! ५ ते २० दिवसांपर्यंत अंथरुणाला खिळून ठेवणारा हा मलेरिया दरवर्षी जगभरात लाखोंचे बळी घेतो. गेली अनेक वर्षे पृथ्वीवर ठाण मांडून बसलेला हा रोग अद्यापी मानवाच्या आटोक्यात आलेला नाही. शिवाय इतर नवनव्या रोगांचे आव्हान आहे ते वेगळेच!
अर्निबध वापरामुळे डासांना कीटकनाशकांविरुद्ध आणि रोगजंतूंना औषधांविरुद्ध प्रतिरोध क्षमता संपादन करण्याचे दुर्दैवी वरदान लाभले असल्याने मलेरियाच्या संपूर्ण उच्चाटनाचे कार्य महाकठीण असले, तरी अशक्यप्राय मात्र नाही. यासाठी शास्त्रज्ञांच्या अविरत संशोधनाव्यतिरिक्त आज मुख्य गरज आहे ती शासन व जनतेची प्रबळ इच्छाशक्ती, पद्धतशीर प्रयत्न आणि सर्व संबंधितांच्या
नियमित प्रबोधनाची!
मच्छर एक कस्पटाएवढा कीटक! पण त्याचा प्रताप एवढा भयंकर की त्याच्या चाव्याने निर्माण होणारा मलेरिया एखाद्याला यमसदनीसुद्धा धाडू शकतो.
प्रदूषण, लालफितीत अडकलेली नोकरशाही, भ्रष्टाचाराने बरबटलेले राजकारण, गलिच्छ वस्त्या, महागाई, काळाबाजार, कर्जबाजारीपणा, भेसळ याच्या जोडीला अंधविश्वास, अज्ञान, आळस, बेजबाबदारपणा आदी वैगुण्यांनी आपला समाज ग्रासलेला असतानाच कधी अँथ्रॅक्स, कधी स्वाईन फ्लू तर कधी मलेरियासारखी रोगराई डोके वर काढून सर्वसामान्यांना आपल्या बाहुपाशात खेचत असते. त्यांना जीवन नकोसे करून टाकत असते.
भौतिक सोयींप्रमाणे आरोग्य हाही प्रत्येकाचा हक्क असून त्याला तो मिळवून देण्याची जबाबदारी शासन आणि डॉक्टरांची असली, तरीदेखील प्रख्यात वैद्यक- इतिहासकार हेन्री सीजरीस्ट यांचे पुढील उद्गार प्रत्येकाला अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारे आहेत.
‘‘लोकांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी स्वत:च करायला हवी. स्वत:ला निरोगी राखण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करायला हवेत. अधूनमधून डोके वर काढणाऱ्या रोगराईविरुद्धचा लढा डॉक्टर मंडळी एकटय़ाने लढण्यास असमर्थ आहेत. रोगराईचा प्रतिकार हे खरे म्हणजे जनयुद्ध असून प्रत्येकाने त्यात हिरिरीने आणि कायमस्वरूपी सहभागी व्हायला हवे.’’
आज आरोग्य विज्ञानातील संशोधन जितके पुढे जात आहे, तितक्याच जोमाने निसर्ग नवे रोग, सद्य औषधांना न जुमानणारे विषाणू (अतिसूक्ष्म रोगाणू) निर्माण करून समाजाला पुन्हा दोन पावले मागे रेटत आहे.
आयुर्वेदाच्या चरक संहितेमध्ये रोगांची व्याख्या (सूत्र : १-१५-१६) अशी केली आहे :
‘‘धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ मनुष्याला संपादित करायचे असतील तर प्रथम त्याने आरोग्यसंपन्न शरीर धारण करायला हवे. रोग मनुष्याला या चारही पुरुषार्थापासून वंचित करून त्याच्या परमसुखाचा नाश करतात. रोग हा मनुष्य जीवनाला उत्पन्न झालेला एक मोठा धोका आहे.’’
आपले शरीर हे सुमारे ७५ हजार अब्ज पेशींची वसाहत असून, त्यामध्ये निरंतर अनेक पदार्थ- वैज्ञानिक व रासायनिक प्रक्रिया घडत असतात आणि या सर्व प्रक्रियांची गोळा-बेरीज म्हणजेच आपले वैचारिक, सामाजिक, मानसिक आणि शारीरिक आरोग्य होय.
पृथ्वीच्या स्वत:भोवती फिरण्याच्या आणि सूर्याभोवतीच्या भ्रमणाच्या आसांमध्ये फरक असल्याने ऋतूचक्राचा जन्म होऊन वातावरणात वैविध्यता येते. याचे जसे फायदे आहेत, तसे काही तोटेदेखील आहेत. महत्त्वाचा तोटा म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतूंमध्ये समाजाच्या विविध थरांमध्ये त्यांच्या जीवनशैलीनुसार आणि वातावरणातील बदलांनुसार विविध आजार जन्माला येऊ लागतात.
काही आजार मात्र ऋतूमानातील बदलांमुळे नव्हे, तर विविध विषाणू आणि अतिसूक्ष्म रोगाणूंमुळे पसरतात. हे रोगजंतू इतके सूक्ष्म असतात की, साध्या सूक्ष्मदर्शक यंत्रातून दिसू शकत नाहीत. त्यांच्यासाठी विशिष्ट प्रकारचाच सूक्ष्मदर्शक वापरावा लागतो. हे रोगाणू शरीरात शिरलेल्या व्यक्तीची जर रोगप्रतिकारकशक्ती कमी असेल, तर ती व्यक्ती इन्फ्लुएन्झा, स्वाईन फ्लू, कांजिण्या, गालगुंड, मलेरियासारख्या रोगांना लगेच बळी पडते. असे रोगाणू केवळ जिवंत पेशींमध्येच नव्या रोगजंतूंची निर्मिती करू शकतात. जर या रोगजंतूंमुळे प्राणी दगावला, तर त्या रोगजंतूंचाही नाश होतो, पण प्राणी फक्त आजारी झाला आणि रोगी व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तींशी संबंध आला किंवा त्याचे रक्त डास आदींच्या चाव्यांमुळे इतरांच्या शरीरात गेले आणि त्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमी असली, तर त्याही व्यक्ती रोगाला बळी पडतात आणि अशा प्रकारे या रोगजंतूंचे अस्तित्व अबाधित राहून समाजात रोगराई फैलावू लागते. मलेरियामुळे व्यक्ती ५ ते २० दिवसांपर्यंत आजारी होऊ शकते, त्यामुळे लोकांची कार्यक्षमता घटून देशाच्या उत्पादन क्षमता व अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम घडू शकतो.
मलेरिया हा जगातील प्रमुख घातक रोगांपैकी एक असून त्यामुळे मृत्यू पावणाऱ्या लोकांची संख्या लक्षणीय आहे. जगभरात या रोगामुळे ०.५ ते १.०० बिलियन डॉलरएवढे नुकसान होते. सुमारे १०९ देशांमध्ये मलेरियाचा फैलाव झालेला असून सर्वाधिक रुग्ण उप-सहारीय आफ्रिका व दक्षिण आशियात आढळतात. जगातील ३.३ बिलियन लोक मलेरियासंभावित क्षेत्रात राहतात. वर्ल्ड मलेरिया रिपोर्ट २००९ नुसार दरवर्षी जगात सुमारे २४३ दशलक्ष रुग्ण सापडतात, तर जवळजवळ ८,६३,००० रुग्ण मलेरियाने मृत्यू पावतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार मलेरियामुळे दरवर्षी १०,००० हून अधिक बाळंतिणींचा आणि २,००,००० हून अधिक नवजात अर्भकांचा मृत्यू होतो.
भारतापुरते बोलायचे झाल्यास दरवर्षी १७ ते २० लाख लोक मलेरियाच्या कचाटय़ात सापडतात आणि १००० हून अधिक दगावतात. भारत सरकारच्या आरोग्य खात्याच्या अर्थसंकल्पातील सुमारे ४० टक्के हिस्सा हा मलेरिया निर्मूलन कार्यक्रमाकरता दरवर्षी राखून ठेवण्यात येतो.
मलेरिया हा एक लाल त्रिकोण असून, त्याच्या एका कोनावर मलेरियाचे जंतू, दुसऱ्यावर मनुष्य आणि तिसऱ्या कोनावर मलेरिया फैलाविणारे डास बसलेले असतात.
मलेरियाच्या उपचारातील एक गंभीर समस्या म्हणजे मलेरियाचे रोगजंतू शक्तिमान असून औषधांचा अतिमारा झाल्यास औषधांना न जुमानण्यासाठी स्वत:मध्ये प्रतिरोध क्षमता विकसित करू शकतात. परिणामी या रोगावर निरंतर नवनवीन औषधे शोधणे भाग पडते.
मुंबईमध्ये दिवसागणिक येणारे बेकारांचे लोंढे, गलिच्छ लोकवस्त्या, गगनचुंबी इमारतींच्या बांधकाम क्षेत्राला आलेले सोन्याचे दिवस, नव्या बांधकामांच्या वेळी मलवाहिन्या आणि जलवाहिन्या यांची सरमिसळ, वातावरणातील दमटपणा, बुरशीचा फैलाव, कचऱ्याचे ढीग हलविण्यातील दिरंगाई, रस्त्यांवरील खड्डे या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणजे डास, माशा, चिलटे यांच्या पुनरुत्पत्तीत कमालीची वृद्धी झाली असून, परिणामी मलेरियासारख्या भयंकर आजारांना सर्वसामान्यांना बळी पडावे लागते.
मलेरिया आणि डासांचा संबंध असल्याचे भारतीयांना फार पूर्वीच उमगले होते असा पुरावा सुश्रृत संहितेच्या एका श्लोकात सापडतो.
सन १८८० मध्ये अल्जेरियातील फ्रेंच सर्जन चार्ल्स लेवरॉन यांनी प्लास्मोडियम या मलेरियास कारणीभूत होणाऱ्या रोगजंतूंचा शोध लावला, तर १८९७ मध्ये ब्रिटिशांच्या भारतीय सेनेतील मेजर जनरल सर रोनॉल्ड रॉस यांनी अॅनोफिलिस प्रजातीच्या डासांमुळे मलेरिया पसरत असल्याचे सिद्ध करून डासांच्या जीवनचक्राचे रहस्य उलगडून दाखविले. या संशोधनाच्या अनुषंगाने पॅट्रिक मैन्सन आणि इटलीचे जिओवन्नी ग्रास्सी यांचीही नावे आदराने घेतली जातात. मलेरिया डासांमुळेच होतो हे सिद्ध करण्यासाठी इटलीच्या जिओवन्नी ग्रास्सी यांचे सहकारी बिग्नामी आणि बास्टी ओनेली यांनी इंग्लंडच्या सर पॅट्रिक मैन्सनजवळ काही डासांना व्हायव्हॅक्स मलेरिया झालेल्या रोग्याचे रक्त पाजून पाठविले, मैन्सनने आपला मुलगा थोर्बर्न मैन्सन आणि प्रयोगशाळा साहाय्यक जॉर्ज वॉरेन यांना त्या मच्छरांचे रक्त टोचले आणि त्यांना मलेरिया झाला. अशा प्रकारे डासांमुळेच मलेरिया होत असल्याचे सिद्ध झाले. १९४९ साली शॉर्ट (Shortt) या शास्त्रज्ञाने प्लास्मोडिअम आणि व्हायव्हॅक्स यांच्या तांबडय़ा पेशींबाहेरील अवस्था (Excerythrocytic Stages of Plasmodium Falciforum and Vivax) शोधून काढून प्रसिद्ध केली.
मलेरिया अॅनॉफिलिस नावाच्या डासामुळे होतो. यांचे आठ उपप्रकार आहेत : १) अॅनॉफिलिस क्युलिफॅसिज् २) अॅनॉफिलिस फिलिपायनेसिज् (३) अॅनॉफिलिस स्टेफेन्सी (४) अॅनॉफिलिस संडिक्स (५) अॅनॉफिलिस मीनिमस (६) अॅनॉफिलिस पलुव्हिअॅटिलिस (७) अॅनॉफिलिस जीपीरिएन्सीज (८) अॅनॉफिलिस सबपिक्टस. पहिले सहा प्रकार उपद्रवी असून मलेरिया जोमाने पसरवितात, तर शेवटचे दोन प्रकार निरुपद्रवी आहेत.
मनुष्यामध्ये मलेरिया ज्या रोगजंतूमुळे होतो, त्या रोगजंतूंच्या चार प्रमुख प्रजाती आहेत. प्लास्मोडियम व्हायव्हॅक्स, प्लास्मोडियम फाल्सीपुरम, प्लास्मोडियम मलेरी आणि प्लास्मोडियम ओव्हेल. असे म्हटले जाते की, जग जिंकायला निघालेल्या प्रतापी सिकंदर बादशहाची जीवनगाथा ३३ व्या वर्षी प्लास्मोडियम फाल्सीपुरम मलेरियाने समाप्त केली.
मलेरियाची तीव्रता ही तो मलेरिया रोगजंतूंच्या कोणत्या प्रजातीमुळे झाला आहे, त्यावर अवलंबून असते. प्लास्मोडियम व्हायव्हॅक्सची संख्या जगात सर्वाधिक आहे. भारतात मलेरिया ७० टक्के याच रोगजंतूमुळे होतो, २५-३० टक्के प्लास्मोडियम फाल्सीपुरमने होतो आणि चार-आठ टक्के केसेसमध्ये दोन किंवा अधिक रोगजंतूंच्या एकत्रिपणाने होतो. सध्या मुंबईत फैलावलेल्या साथीत काही केसेस व्हायव्हॅक्स व फाल्सीपुरमच्या एकत्रित आढळल्या असून डॉक्टर्स आणि संशोधकांची एकच तारांबळ उडाली आहे. भारतात प्लास्मोडियम मलेरीने होणाऱ्या मलेरियाच्या केसेस अगदी नगण्य म्हणजे एक टक्का आढळतात. प्लास्मोडियम ओव्हेल हा विशेषत: आफ्रिकेत व व्हिएतनाममध्ये सापडतो. भारतात वर्षभरातील पाच टक्क्यांहून अधिक मलेरिया रुग्ण आसाममध्ये आढळतात.
डासांचे जीवनचक्र चार अवस्थांमधून जाते : १) एग्ज् (अंडी) २) लार्वा (अळ्या) ३) प्युपा (कोशित) ४) अॅडल्ट (वयस्कर). यातील पहिल्या तीन अवस्था पाण्यामध्ये पाहायला मिळतात. चौथ्या अवस्थेत डासांचा पूर्ण विकास होऊन तो स्वतंत्रपणे उडू लागतो. मादी-डास जलपृष्ठावर एका वेळी १५०-३०० अंडी घालू शकते. वृद्ध डासांच्या शरीरामध्ये सामान्यपणे मलेरियाचे जंतू आढळतात. डासांच्या वयाचा अंदाज त्यांच्या पंखांवर असलेल्या खवल्यांच्या संख्येवरून बांधता येतो. ज्या डासांच्या पंखांवर खवले अधिक तो डास तरुण, तर ज्या डासांच्या पंखांवर खवले कमी तो डास वृद्ध असे मानले जाते. तथापि डास पकडताना त्यांना झालेल्या इजेमुळेसुद्धा खवल्यांची संख्या घटू शकते, त्यामुळे वय ओळखण्याची ही पद्धत तेवढी अचूक नाही. वय ओळखण्याची दुसरी पद्धत म्हणजे डासांच्या बीजवाहिनीची पिशवी (Ampules of Oviduct) या पद्धतीने डास तरुण की वृद्ध ते अचूक ठरविता येते.

मलेरियाचा फैलाव :
मलेरिया झालेल्या व्यक्तीच्या रक्तात मलेरियाचे जंतू दबा धरून बसतात. अशा व्यक्तींना अॅनॉफिलिस डास चावल्यास रक्तातील मलेरियाचे रोगजंतू या डासांच्या सोंडेवाटे, तोच डास जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला चावतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या रक्तात घुसतात. अशा प्रकारे एकच डास ४० पेक्षा जास्त व्यक्तींना चावे घेऊन मलेरिया पसरवू शकतो.
मलेरियातील ताप
मलेरिया तापाच्या साधारणपणे तीन अवस्था आढळून येतात : १) रोग्याला कडाडून थंडी वाजते, सर्वाग थरथरू लागते. २) एक-दोन तास शरीराचे तापमान १०५-१०६ फॅ. पर्यंत वाढून ताप येतो. ३) भरपूर घाम येतो.
मलेरिया निर्मूलनासाठी उपाययोजना :
१) डबकी, जलाशये, पाणथळीच्या जागा, पाण्याची पिंपे, टाक्या आदी डासांची सुमारे २९ उत्पत्ती स्थाने शोधून काढण्यात आली असून यांच्यावरच योग्य उपाययोजना केली, तर डास उत्पत्ती थांबून मलेरिया प्रभावीपणे आटोक्यात येऊ शकेल.
२) गॅम्बुशिया (Gabusia) नावाचे मासे डासांच्या अळ्या (Larvae) खातात आणि त्यामुळे जलाशये वगैरे ठिकाणी अशा माशांची पैदास केल्यास हे मासे डासांच्या अळ्यांना खाऊन टाकतील आणि डास उत्पत्ती थांबेल.
३) मलेरियाबाधित परिसरात मैलाथिऑन, डेल्टामेथ्रिन आदी रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करून तसेच धूर करून डासांचा नायनाट करता येतो. तथापि, भारत सरकारच्या मलेरिया संशोधन केंद्राने राष्ट्रीय मलेरिया निर्मूलन कार्यक्रमाच्या माध्यमातून केलेल्या एका पाहणीनुसार कीटकनाशकांविरुद्ध डास आपली प्रतिरोधक्षमता काही कालावधीत तयार करू शकत असल्यामुळे डीडीटी, एचसीएच वगैरे कीटनाशके त्यांच्या अर्निबध वापरामुळे कूचकामी ठरून मलेरियाचा प्रकोप वाढतो आहे. शिवाय कीटकनाशकांच्या फवारणीमुळे वातावरण प्रदूषित होते ते वेगळेच. नव्या प्रभावी कीटकनाशकांच्या होणाऱ्या वारंवार वापरामुळे त्यांच्या विरुद्धसुद्धा काही काळाने डासांमध्ये प्रतिरोधक्षमता निर्माण होईल हे निश्चित, कारण हा निसर्गनियमच आहे. एखाद्या प्राण्याच्या आरोग्यास घातक अशा वस्तूचा वारंवार उपयोग होऊ लागला तर काही काळाने त्या प्रजातीतील प्राण्यांचे शरीर-क्रिया-तंत्र त्या वस्तूविरुद्ध स्वसंरक्षणाचे उपाय शोधून काढते आणि म्हणूनच डासांवर विजय मिळविण्याकरता नव्या प्रभावी कृत्रिम रासायनिक कीटकनाशकांव्यतिरिक्त इतर काही मार्गाचा अवलंब करणे योग्य ठरते. यांच्यामध्ये आयुर्वेदिक उत्पादनांचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल. घरगुती वापरासाठी ती परिणामकारक तर आहेतच, शिवाय तुलनेने स्वस्तसुद्धा आहेत. यामध्ये कडुनिंबाचा विशेष उल्लेख करावा लागेल. कडुनिंबाशिवाय गावठी पुदिना (Mentha Piperita), निलगिरी (Eucalyptus), घणेरी (Lantana Camara), शिशम (Dalbergia Sisoo) आदी वनस्पती डास निर्मूलन कार्यासाठी प्रभावशाली ठरत आहेत.
४) कडुनिंब, लवंग, अजवान, कापूर, तेजपात, सिंट्रोनेला, देवदार, चीड, युकॅलिप्टस, जिरेनियम आदी वृक्षांपासून बनविलेल्या तेलांमध्ये डासांना काही तास पळवून लावण्याची क्षमता असल्याचे सिद्ध झाले आहे. सिंट्रोनेला आणि कडुनिंबापासून बनविलेली तेले विशेष प्रभावकारी आहेत. कडुनिंबाचे तेल खोबरेल तेलात मिसळून सर्वागाला चोळल्यास डास कित्येक तास शरीराजवळ फिरकत नाहीत.
५) बाजारात उपलब्ध असलेली ओडोमॉस क्रीमसारखी डासरोधी मलमे चोळल्यास डास फिरकत नाहीत.
६) अल्ट्रा व्हायोलेट किरणांची काही विद्युत उपकरणे डास मारण्यासाठी वापरता येतात.
७) साधारणपणे रात्री आठच्या सुमारास डास आपले भक्ष्य शोधण्यासाठी बाहेर पडतात. त्यामुळे सूर्यास्तानंतर उघडी दारे, खिडक्या इत्यादी धातूच्या/ नायलॉनच्या अति बारीक जाळ्यांनी बंद केल्यास डासांचा घरात शिरकाव होऊ शकणार नाही.
८) अॅनॉफिलिस हा डास माणसांपेक्षा गाई, मेंढय़ा, डुकरे आदी प्राण्यांना चावणे अधिक पसंत करत असल्याने शक्य असल्यास घराजवळ संरक्षक कवच म्हणून असे प्राणी पाळावेत, तथापि त्यांच्या मल-मूत्राची स्वच्छता राखणे आवश्यक आहे.
९) बांधकामे चालू असणाऱ्या ठिकाणी पाणी साचू न देणे आदी काळजी घ्यावी.
१०) रस्त्यांवरचे खड्डे बुजवून टाकावेत.
११) नेहमी दलदल होणाऱ्या परिसरात ज्यांची मुळे जमिनीवरील पाणी वेगाने शोषून घेतात, अशा वृक्षांची लागवड करावी.
१२) आजकाल मध्यमवर्गीय समाजात परदेशी प्रजातीची कुत्री (लॅब्रॅडॉर, डॉबरमॅन, पामोलियन इ.) पाळण्याचे फॅड आले असून, सकाळी प्रात:विधीसाठी या कुत्र्यांना फुटपाथवर नेले जाते. तसा कुत्रा हा स्वच्छताप्रिय प्राणी! आपल्या विष्ठेवर तो पायाने माती ओढल्याशिवाय राहत नाही; परंतु आजकालच्या डांबर व सीमेंटच्या जंगलात माती नावालाही कोठे उरलेली नाही. मैदानेही मोजकीच उरली आहेत.
मध्यंतरी रस्त्यांवर कुत्र्यांना मांस, बिस्किटे खायला घालण्यावर बंदी घालण्यात आली होती, तशा प्रकारची कारवाई आपल्या कुत्र्याची विष्ठा साफ न करणाऱ्या मालकांवर केली गेल्यास रस्त्यांवर, फुटपाथवर घाण टाकण्याच्या प्रवृत्तीला आळा बसेल आणि डास, माशांचा फैलाव थांबेल.
१३) सार्वजनिक ठिकाणे जेथे लोकांच्या लांबच लांब रांगा लागतात. विशेषत: मंदिरे, बस स्टॉप्स, रेल्वेचे तिकीट घर तेथे स्वच्छता मोहिमा राबविणाऱ्यांनी विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
१४) मलेरियाग्रस्त क्षेत्रातील व्यक्तींनी संपूर्ण शरीर झाकणारे कपडे घालावेत.
१५) रात्री मच्छरदाणी, मच्छर अगरबत्तीचा उपयोग करावा, तथापि मच्छर-अगरबत्तीचा मानवी शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने ती शक्यतो दूर कोपऱ्यात लावावी.
१६) कडुनिंबाच्या तेलाचा दिवा लावावा.
१७) लोकांनी स्वत:चे राहणीमान उंचावणे, स्वच्छतेच्या नियमांचे पालन करणे, परिसरात पाणी व कचरा साचू न देणे.
१८) पोषक आहार, नियमित व्यायाम यांनी रोगप्रतिकारकशक्ती वाढत असल्याने प्रत्येकाने तसा आहार-विहार ठेवणे.
औषध उपाययोजना :
मलेरिया आहे की नाही हे ओळखण्यासाठी रक्ताची चाचणी घेतली जाते. ही रक्त चाचणी Smear Testing, ELISA Kit आदी पद्धतींद्वारे करता येते. रक्त चाचणी, रुग्णास थंडी/ हुडहुडी वाजत असताना केल्यास अधिक अचूक परिणाम मिळतात.
मलेरियाबाधित रुग्णास त्वरित वैद्यकीय सल्ल्याने औषधोपचार चालू करणे आवश्यक आहे. प्राथमिक लक्षणे दिसताच २४ तासांत प्रभावी औषध योजना करावी लागते. मलेरियारोधी औषधांमध्ये क्लोरोक्विन, क्विनाईन, आर्टमिजिनीन्, सल्फोनामाइड आदी औषधांचा मोलाचा वाटा आहे. तथापि, काही औषधांविरुद्ध मलेरियाच्या रोगजंतूंनी प्रतिरोध क्षमता विकसित केली असून, ते या औषधांना आता जुमानासे झाले आहेत. स्वीडिश वनस्पतीतज्ज्ञांनी १६४० साली शोधलेल्या सिंकोना बार्क तसेच आयुर्वेदातील माका/ भृंगराजमध्येदेखील मलेरियारोधी गुणकारी तत्त्वे आढळून आली आहेत. इंट्रोव्हेनस इंजेक्शनचा उपयोग करूनदेखील मलेरिया बरा करता येतो, पण त्यासाठी रुग्णाने दवाखान्यात दाखल होणे आवश्यक असते. मलेरियाच्या प्रभावी नियंत्रणासाठी लस शोधून काढण्याचे अथक प्रयत्न जगभर चालू आहेत. तथापि, या रोगजंतूंची प्रतिकारक्षमता आश्चर्यकारकरीत्या वाढतच असल्याने तसेच लस-विकास कार्यक्रम अति खर्चिक व दीर्घकाळी असल्याने, अद्यापि म्हणावे तसे यश हाती लागलेले नाही.
|